न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी रेल्वे विभागाच्या कर्मचार्यांनी चिंचवड रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील वाढलेली झाडे तोडण्याचे काम सोमवारी (दि. २९) रोजी विनापरवाना सुरू केले होते.
चिंचवड रेल्वे स्टेशन शेजारील पूर्ण वाढ झालेली जुनी झाडे, विनापरवाना तोडण्यात येत असल्याची माहिती कळताच, भाजपचे नगरसेवक व वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य, शीतल शिंदे यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली व रेल्वे विभागाच्या कर्मचार्यांना वृक्षतोडीपासून रोखले. तत्पूर्वी सुमारे १५ झाडांची रेल्वेच्या कर्मचार्यांकडून कत्तल करण्यात आली होती.
नगरसेवक शितल शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परवानगीशिवाय झाडे तोडता येणार नाहीत, असे ठणकावून सांगितले, परंतु ‘आमच्या हद्दीतील आम्ही झाडे तोडत आहोत’, असे उर्मट उत्तर रेल्वे विभागाच्या अधिकार्यांनी दिले. शेवटी रेल्वेकडून वृक्षतोडीचे काम थांबविण्यात आले.