न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- शहरातील कचरा उचलण्याच्या निविदेत ८४ कोटींचे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी व संगनमताने निविदा भरणाऱ्या दोन्ही ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या मागणीवर समाजवादी पक्षाचे पदाधिकारी ठाम आहेत. ही कारवाई न झाल्याने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले आहे.
पिंपरी-चिंचवड मधील कचरा मोशी डेपोपर्यंत वाहून नेण्याच्या निविदा प्रक्रियेत केवळ दोन ठेकेदार सहभागी झाले होते. शहराच्या एका भागाचा मे. बी. व्ही. जी. व दुसऱ्या भागाचा मे. ए.जी. एन्व्हायरो यांना ठेका देण्याचा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला. मात्र हा जुनाच प्रस्ताव मंजूर करताना त्यामध्ये फेरबदल केल्याने ८५ कोटी रुपये वाचत असल्याचा दावा केला असला तरी यात तेवढाच भ्रष्टाचार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा चुकीचा प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच या दोनही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. शहराध्यक्ष रफिक कुरेशी, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवी यादव, सालार शेख व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.










