न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खेड प्रतिनिधी (३ नोव्हें.) :- पदाचा दुरुपयोग करून खोट्या दस्तऐवजाच्या माध्यमातून भोगवटा वर्ग दोनची जमीन भोगवटा वर्ग एक तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेड महसूल नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश पुण्याचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला आहे.
बाबुराव बबन बोडके असे निलंबित झालेल्या नायब तहसीलदारांचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, चासकमान धरणांतर्गत साकुर्डी (ता. खेड) येथील शेतकरी विठ्ठल राघू बोंबले यांच्या जमिनीचे १९७९ मध्ये चासकमान धरणासाठी संपादन करण्यात आले होते. त्याबदल्यात त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी खरपुडी बुद्रुक येथे १ हेक्टर ५८ आर इतकी जमीन मंजूर केली होती.
महसूल नायब तहसीलदार बी. बी. बोडके यांनी तहसीलदारांच्या अधिकारपदाचा गैरवापर करून ही जमीन भोगवटा वर्ग एक असा अहवाल तयार केला होता. याबाबत तत्कालीन तहसीलदार अर्चना यादव यांना संशय आल्याने, त्यांनी संबंधित तलाठी व मंडलाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला असता, हे भोगवटा वर्ग दोनचे भोगवटा वर्ग एक पत्र नायब तहसीलदार बाबुराव बबन बोडके यांनी तयार केल्याचे लक्षात आले. त्यानंतर नायब तहसीलदार बोडके यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आला होता. खेड पुनर्वसन कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुनील रोकडे यांनी याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
ही जमीन गट क्र. १२७२/२, ११५७/२,११५८/२ या पुनर्वसनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या मिळकती जमीन भोगवटा वर्ग एक करण्यसाठी तहसीलदार पदाचा कार्यभाग नसतानाही तशी स्वाक्षरी झालेले पत्र दि. १५ जून २०१८ रोजी कामगार तलाठी यांना दिले आहे. त्यांच्या नोंदी असलेल्या कार्यान्वित नोंदवहीतील पाने फाडली आहेत. असा आरोप ठेवत नायब तहसीलदार बोडके यांच्या विरोधात राजगुरुनगर पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करून पुणे विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता. या अहवालात बोडके यांना सेवेतून निलंबित करण्याची शिफारस केली होती. यावरून बोडके यांचे वर्तन लोकसेवक म्हणून सचोटीचे नसल्याचे स्पष्ट केले होते.