न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ नोव्हें.) :- यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक ०७ नोव्हेंबर २०१८ (बुधवारी) सायंकाळी ६ वाजून ०१ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३३ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे.
यातही सुक्ष्म मुहूर्तानुसार “संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांपासून, ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंतचा” काळ अधिक जास्त शुभ आहे हे लक्षात घेणे. (छपन्न मिनिटे) हा छप्पन्न मिनिटांचा सुक्ष्म मुहूर्ताचा कालावधी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या काळात तुमचे पूजन सुरु हवे व इतर सर्व ऍक्टिविटिज संपूर्णपणे बंद असाव्यात.
या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती “श्री” या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आपल्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी आगमन होणे अपेक्षित आहे.
या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बँकेची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)
…. मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती श्रीविष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका…नुसते मानसिक स्मरण केले किंवा ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप १०८ वेळा करा तरी चालेल)
घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे….पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने पण अगदी मनापासुन करावेत. लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा.
खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा….जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा….ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत.
श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत)
१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)
२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:
३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात
४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा
५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:
६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:
७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे
सचिन मधुकर परांजपे (ब्लॉगीस्ट)