- पुनावळे, ताथवडे गावाच्या समस्या सोडवण्याची केली मागणी.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुनावळे प्रतिनिधी (१६ नोव्हें) :- नगरसेवक मयूर कलाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप पवार यांनी पुनावळे येथील अनेक समस्यांचा पाढा खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वाचला. खासदार सुप्रिया सुळे आज शुक्रवार (दि.१६) रोजी पुनावळे, ताथवडे गावाच्या पाहणी दौऱ्यासाठी या परिसरात आल्या होत्या.
यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, मा. नगरसेविका यमुना पवार, महिला आघाडी उपाध्यक्षा सुप्रिया पवार व ताथवडे, पुनावळेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावचे ग्रामदैवत श्री. नृसिंह मंदिर येथे बैठक घेण्यात आली. संदीप पवार यांनी पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचते त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत असून वाहतुकीचा बट्ट्याबोळ होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला, तसेच ताथवडे व पुनावळेतील अंडरपासची उंची वाढवण्याची मागणी केली.
नगरसेवक मयूर कलाटे यांनी राष्ट्रवादीची सत्ता असताना या परिसरात अनेक विधायक कामे केली असल्याचे सांगितले, परंतु सत्ताधारी भाजप या गोष्टींकडे कायमच कानाडोळा करीत आला असून, प्रभागातील अनेक कामांना निधीच मिळत नसल्यामुळे नागरिकांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले व खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाची दखल घेण्याची मागणी केली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते आणि राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांशी बैठक घेऊन, तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील ‘अंडरपास’ ची उंची वाढवण्याकरीता पाऊले उचलणार असल्याचे बैठकीत सांगितले.