- ‘स्वतंत्र बाह्य जाहिरात धोरणास’ विधी सभेची मान्यता.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हें) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रशासन व पदाधिकारी यांच्यावतीने विविध प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आकाशचिन्ह व परवाना विभागाने बाह्य जाहिरात धोरण मसुदा तयार केला आहे. विधी समितीच्या शुक्रवार (दि. १६) रोजीच्या सभेत ‘स्वतंत्र बाह्य जाहिरात धोरण’ या विषयास विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी यांनी व सदस्यांनी मान्यता दिली असून, सदर प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी पाठविला आहे.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका कलम २४४ व कलम २४५ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (जाहिरात व फलक नियंत्रण) नियम २००३ या नियमातंर्गंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आकाशचिन्ह व परवाना विभाग खासगी व महापालिकेच्या जागेवर जाहिरात फलकाला परवानगी देण्याचे कामकाज करते. मात्र, खासगी व महापालिकेच्या जागेवर जाहिरात फलकाबाबत स्वतंत्र असे जाहिरात धोरण तयार नसल्यामुळे शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणा-यांचा सुळसुळाट झाला होता.
या पार्शवभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील संबंधितांना खासगी मालकीच्या आणि पालिकेच्या जागेवर जाहिरातीचे फलक लावण्यासाठी महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.