- येत्या २ दिवसांत नाव नोंदणीचे आरोग्य विभागाचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- कोरोना महामारी नियंत्रणासाठी पिंपरी – चिंचवड शहरात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शासकीय, महापालिका व खासगी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी करून संकलन केले जात आहे.
शहरातील खासगी रूग्णालय व दवाखान्यांतील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी येत्या २ दिवसांत व तातडीने नाव नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी बुधवारी (दि. २३) केले आहे.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शहरातील शासकीय, महापालिका व खासगी रूग्णालय व दवाखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. शासकीय व पालिका रूग्णालयातील कर्मचारी यांची नोंदणी केली आहे. मात्र, खासगी रूग्णालयांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन, दंततज्ज्ञ संघटना, पॅथोलॉजिस्ट संघटना, नर्सेस असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन आदींचे सर्व पदाधिकारी, सदस्य, प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी तातडीने करावी. ही नोंदणी पालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी अॅपवर करावी, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.