- आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी २०२१) :- कोरोना संक्रमणामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनमधून सवलत देण्यात आली होती. आता कोरोना संसंसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १ फेब्रुवारीपासून थंम्ब इम्प्रेशनऐवजी फेस रीडिंग मशिनद्वारे बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक व सक्तीचे करण्यात आली आहे, तसे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
पालिका आस्थापनेवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फेस रीडिंगर जिस्ट्रेशन ३० जानेवारीच्या आत पूर्ण करून घेण्याचे आदेश आयुक्तांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल ३० जानेवारीपर्यंत प्रशासन विभागाकडे सादर करावा. रजिस्ट्रेशन माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर करावे. रजिस्ट्रेशन न केल्यास किंवा एकापेक्षा अधिक ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याचे आढळून आल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाणार आहे.
ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन वेगवेगळ्या कार्यालयाचे पदभार असल्यास त्यांना कार्यरत आस्थापना विभागाच्या अतिरिक्त अन्य ठिकाणी फेस रीडिंग रजिस्ट्रेशन विभागप्रमुखांच्या शिफारसपत्राशिवाय केले जाऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.