- ‘राज्यात सत्ता आपली; मुख्यमंत्रीही आपलेच; जोमाने कामाला लागा – शहरप्रमुख भोसले.
- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बैठकीत शिवसैनिकांचा निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शहर शिवसेना सर्व आजी-माजी पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आकुर्डीतील शिवसेना भवनात आज मंगळवारी (दि. ६) रोजी पार पडली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाचे संपर्क नेते खासदार संजय राऊत, उपनेते व पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक रवींद्र मिर्लेकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख बाळा भाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे पदाधिका-यांनी सांगितले. बैठकीत शिवसेनेने पालिका निवडणुकीचे रणशिंग फुकले.
प्रत्येक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी महापालिकेतील शेवटच्या मतदारापर्यंत संपर्क करून शिवसेनेची व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवावीत. आगामी निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या दृष्टिकोनातून पक्ष पूर्ण ताकदीनिशी कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे. लवकरच वॉर्डनिहाय बैठका घेऊन पुढील रणनीती ठरविणार असल्याचे मार्गदर्शन शिवसेना शहरप्रमुख अॅड सचिन भोसले यांनी केले.
यावेळी शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत को-हाळे, नवनाथ तरस, हरीश नखाते, चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, सुरेश राक्षे, भरत साळुंके, प्रदीप दळवी, गोरख पाटील, विजय साने, चेतन शिंदे, अमित निंबाळकर, श्रीमंत गिरी, कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, दिलीप भोंडवे, शिवाजी पाटील, किरण दळवी, सचिन चिंचवडे, गणेश वायभट, नरसिंग चौव्हान, महेश कलाल, सुनील पालेकर, सवाताराम महापुरे, लालचंद शर्मा आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक सात महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सर्वशक्तिनिशी कामाला लागले आहेत. शिवसेनेनेही मैदानात शड्डू ठोकला असून, पालिकेवर स्वबळावर भगवा फडकविण्याचा निर्धार करीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपच्या कारकिर्दीत पालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप करत भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्यास शिवसेना बहुमत राखेल, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. ‘राज्यात सत्ता आपली आणि मुख्यमंत्रीही आपलेच असल्याने अधिक जोमाने कामाला लागा, असे आवाहन यावेळी विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांनी केले.
















