- पिंपरीत अत्यवस्थ व सौम्य लक्षण असणारी रुग्ण ठणठणीत बरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- कोरोनाबाधित रुग्णांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. नुकत्याच पिंपरीतील डी वाय पाटील रुग्णालयाने दोन कोरोना बाधित रुग्णांना “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार देऊन पूर्णपणे बरे केले आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
या औषधामध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण आहे जे कोरोना विषाणूंविरूद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची नक्कल करतात. हे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे. हे विविध प्रकारच्या आजारांविरूद्ध अत्यंत प्रभावी आहेत.
या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते. यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यांची काळजीपूर्वक क्लिनिकल ट्रायल्ससाठी निवड करण्यात आली, या दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली, ही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना अवरोध करतात. त्यामुळे कोरोना विषाणूंना दुसऱ्या पेशीत प्रवेश करता येत नाही व कोरोना रोखण्यास मदत मिळते.
२४ तासाच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. या उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरिरातून कोरोनाची लक्षणे गायब झाली, शिवाय या उपचारपद्धतीमुळे त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणाम ही झाले नाहीत. त्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले. “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसाच्या आत बरे होतात, अशी माहिती रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. (नि. ब्रिगेडिअर) एम. एस. बरथवाल यांनी दिली. कोरोनाच्या रुग्णामध्ये“अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धतीद्वारे मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज परिणामकारक काम करत असल्याचं ते म्हणाले.


















