- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- “येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात ५ वी ते ८ वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल”, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
सध्या राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, त्या ग्रामीण भागात ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. आता त्यामध्ये शहरी भागाचा देखील समावेश करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.