- भोसरीतील बॅटऱ्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वृद्धाचा टोकाचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- भोसरीत वाहनांच्या बॅटऱ्या विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या वृद्धाने मी दुकानात जातो, असे त्यांच्या पत्नीला सांगितले. सायंकाळी ते घरी न आल्याने घरच्यांनी दुकानातील मुलाला फोन केला. वडील दुकानातून घरी जाण्यासाठी किती वाजता निघाले, असे त्यांच्या मुलांनी विचारले. वडील आज दुकानात आलेच नाहीत. त्यांचा दुपारी दीडला फोन आला होता. मी आळेफाटा येथे नातेवाईकांकडे जात आहे. रात्री साडेदहापर्यंत परत येईल, असे त्यांनी फोनवरून सांगितल्याचे दुकानातील मुलगा म्हणाला.
त्यानुसार घरच्यांनी आळेफाटा येथील नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र ते तेथेही आले नव्हते. वैतागून घरच्यांनी निगडी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास तक्रार केली. ते ओतूर येथे असल्याचा पोलिसांनी शोध घेतला. कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबिय तत्काळ ओतूर येथे गेले. नातेवाईक व स्थानिकांच्या मदतीने वृद्धाचा शोध घेतला. ओतूर येथील धरणाच्या बॅक वॉटर परिसरात त्यांचे कपडे मिळून आले. पाण्यात शोध घेतला असता दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला.
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली. भिशी मेंबरने पैसे भरले नाहीत. ते पैसे मी भरले. मात्र त्यांनी ते पैसे मला परत केले नाहीत. भिशी मेंबरला वैतागून जीवन संपवत आहे, मी आत्महत्या करीत आहे, ओतूर गाव पुलाजवळ, वेळ संध्याकाळी सात वाजता, असे चिठ्ठीत लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. कमरुद्दीन गुलामुद्दीन मुलाणी (वय ७४, रा. निगडी प्राधिकरण), असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यावसायिकाचे नाव आहे.