- पालिकेकडून पत्रे व बॅरिकेड लावून विसर्जन घाट बंद..
- गणेशमूर्ती संकलन केंद्राकडेच जमा करा; पालिकेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२१) :- गणेश विसर्जन ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड शहरासह रावेत परिसरातील जाधव घाट व किवळे गावातसुद्धा विसर्जन घाट परिसरात महापालिकेच्या वतीने पत्रे बांधून व बॅरिकेड लावून बंद करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी स्थानिक पोलिस बंदोबस्त व महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले आहे.
शहरात शुक्रवारी घरोघरी व सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे आगमन झाले. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये यासाठी घाटावरचे सर्व रस्ते व मार्ग पत्रे बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. पालिकेकडून चौकाचौकात विसर्जन मंडप उभारण्यात आले आहे. या ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात येत असून नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गर्दी टाळण्यासाठी रावेत व किवळे-मुकाई चौक या ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांकडून थेट नदीपात्रात विसर्जन होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. तिथे पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने सोसायटीव वस्तीमधून गणेशमूर्ती संकलन करण्यासाठी वाहने उपलब्ध करण्यात आले आहेत. शहरात १०७ मूर्ती संकलन केंद्र असून तर त्या क्षेत्रात पाच वाहने नेमण्यात आली आहेत. त्यानुषंगाने शहरात जवळपास ८० वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यावर अधिकारी गिरडे व निकम लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख यांनी दिली.