- प्रभागातील पाणीपुरठ्याची कामे पूर्ण..
- नगरसेवक उत्तम केंदळे यांची आयुक्तांकडे मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात २०११ साली “सुवेझ” या फ्रान्सच्या कंपनीमार्फत चोवीस तास पाणीपुरवठ्याबाबत पायलट प्रकल्पासाठी सर्व्हे करण्यात आला होता. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुवेझ कंपनीला यमुनानगरमध्ये प्रकल्प राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या. सुवेझने ‘हिलेनिअम’ सिस्टीमद्वारे हा प्रकल्प यशस्वी केला. मात्र, दोन वर्षांनंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला. हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेविका कमल घोलप उपस्थित होत्या.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केंदळे यांनी म्हटले आहे की, यमुनानगरची जमीनपातळी उंचावर असल्यामुळे दुस-या मजल्यावरसुद्धा पाणी चढत नव्हते. यमुनानगरमधील काही सोसायट्यांमधे पाणी साठविण्यासाठी टाक्यांची व्यवस्था नव्हती. पाणीच मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या खुप तक्रारी येत होत्या. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सुवेझ कंपनीबरोबर करार करून तंत्रज्ञानाच्या साह्याने पाणी पुरवठा सुरळीत केला. मात्र, दोन वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे. शहराला दररोज पाणी मिळावे यासाठी भामा-आसखेडचे पाणी आणण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला पाणी मिळावे; यासाठी मी देखील वारंवार पाणीपुरवठा विभागाशी व तत्कालीन आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे.
दरम्यानच्या काळात प्रभागात २४×७ पाणी योजनेअंतर्गत जीर्ण झालेल्या पाण्याच्या लाईन, खराब झालेले पाण्याचे कनेक्शन तसेच काही ठिकाणी पाणी कंट्रोल वाल, बुस्टर लाईन या पद्धतीची ९० टक्के कामे यमुनानगर, निगडी, साईनाथनगर, सेक्टर क्रमांक २२ या भागात पूर्ण झालेले आहेत. शिवाय स्कीम क्रमांक १,२,५,६,९ याठिकाणी पाण्याची साठवणूक करण्यासाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी हा पायलट प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करून नागरिकांना दिवाळीचे गिफ्ट द्यावे, असे या निवेदनात केंदळे यांनी म्हटले आहे.
















