- नाट्यगृहावर दुप्पट खर्च; ठेकेदाराची चंगळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी – प्राधिकरणात ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. आठ वर्षांत या नाट्यगृहाचे काम ३७ कोटींवरून ७० कोटींवर पोहोचले आहे. आता या नाट्यगृहातील विद्युतकामांवर सव्वासात कोटी खर्च करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वतीने निगडी प्राधिकरणात ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने ८०० प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असलेले नाट्यगृह उभारण्यात येत आहे. पेठ क्रमांक २६ मधील ५ हजार चौरस मीटर भूखंडावर हे नाट्यगृह उभे केले जात आहे. या नाट्यगृहामध्ये २२० प्रेक्षकक्षमता असलेले एक लहान सभागृह, ११० बैठक व्यवस्था असलेले कॉन्फरन्स हॉल, कलादालन तसेच १२ निवासी खोल्या बांधण्याचे नियोजन आहे. नाट्यगृहात आधुनिक पद्धतीने विद्युत व्यवस्था करणे, ध्वनीव्यवस्था करण्याचे नियोजन आहे. नागरिकांसाठी रेस्टॉरंटची सोयही करण्यात येणार आहे. सध्या फ्लोअरिंग, विद्युतविषयक कामे, इंटेरिअर अशी अंतर्गत कामे सुरू आहेत.
कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया निवासी खोल्यांचे आणि बाह्य सजावटीचे कामही अर्धवट आहे. या नाट्यगृहाच्या कामाला सन २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. त्या वेळी ३७ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानंतर हा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. नाट्यगृहाचे काम सुरुवातीपासून संथगतीने सुरू आहे. या नाट्यगृहातील आवश्यक साऊंड सिस्टिम उदवाहक यंत्रणा, स्टेज लाईटिंग, फायर फाइंटिंग आणि फायर अलार्म सिस्टिम, वातानुकूलित यंत्रणा आणि परिसरातील स्ट्रीट लाइट सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी कोटी ७० लाख ९३ हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. मात्र, तीन वेळा निविदा मागवूनही एस अॅण्ड जे बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराची एकच निविदा सादर झाली. त्यांनी निविदा दरापेक्षा ८.९९ टक्के जादा दर सादर केला. त्यांना सव्वासात कोटींचे हे काम देण्यात येणार आहे.