- हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांचं निधन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२१) :- तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून देशासाठी ही सर्वात धक्कादायक अशी घटना आहे. रावत यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला भारतीय हवाईदलाने दुजोरा दिला आहे.
तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर ते तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. अपघातामध्ये आधी ११ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता हेलिकॉप्टरमधील एकूण १४ व्यक्तींपैकी १३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
दरम्यान, हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ व्यक्तींचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारतीय वायुदलाकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ प्रवासी होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने बचावकार्य हाती घेतलं होतं.