- नाशिक फाट्यावरील घटना; संबंधिताविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२१) :- मेट्रो स्टेशनचे काम करताना लाकडाचे तुकडे रस्त्यावर पडले. त्यामुळे एक दुचाकीस्वार जखमी झाला. नाशिक फाटा येथे सोमवारी (दि. २०) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.
अमोल फकिरा कदम (वय ४०, रा. शिरगाव, ता. मावळ) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मेट्रो स्टेशनचे बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराच्या जबाबदार व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक फाटा येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. फिर्यादी अमोल कदम आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून रस्त्याने जात होते. त्यावेळी नाशिक फाटा येथे मेट्रो स्टेशनच्या कामावरून लाकडाचा तुकडा अमोल यांच्या डोक्यात पडला. सुदैवाने अमोल यांनी हेल्मेट घातले असल्याने त्यांना गंभीर इजा झाली नाही. त्यांच्या हाताला दुखापत झाली. मेट्रोने स्टेशनचे काम कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराच्या संबंधित जबाबदार इसमांनी रस्त्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या नाहीत.