- नव्याने सादर केलेले तब्बल २० हजार अर्ज बाद होण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२१) :- जिल्हा निवडणूक आयोगाने नवीन मतदार नोंदणी अभियान १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२१ या ३५ दिवसांच्या कालावधीत पिंपरी – चिंचवड शहरात राबविले. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय पक्ष, विद्यमान नगरसेवक व इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरून ते संबंधित मतदार नोंदणी कार्यालयांकडे जमा केले. अभियानात चिंचवड विधानसभा मतदार संघात २९ हजार ६९३, पिंपरी मतदारसंघात १८ हजार १९, भोसरी मतदारसंघात २९ हजार ५३८ आणि भोर मतदारसंघातील ताथवडे गावातील ५०० अर्ज प्राप्त झाले.
यातील काही अर्जासाठी जोडलेले कागदपत्रे बोगस असल्याचे दिसत असून या अर्जाची छाननी करण्याचे काम चालू आहे. वीजेचे बिल, गॅस नोंदणी पुस्तिका, रेशन कार्ड, बँक पासबुक, मिळकतकराचे बिले बनावट असल्याचे दिसत आहे. तसेच, पत्याचा एकच पुरावा तब्बल २० ते २५ अर्जांना जोडण्यात आला आहे. त्यामुळे मतदार नोंदणी अधिकारी व कर्मचारी अक्षरशः चक्रावून गेले आहेत. कागदपत्राबाबत शंका असल्यास अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावून घेण्यात येत आहे. योग्य कागदपत्र सादर केल्यास त्यांची नोंदणी केली जात आहे. अन्यथा अर्ज बाद केला जात आहे. अर्ज बाद होण्याचे प्रमाण ३० ते ३५ टक्के इतके आहे. त्यामुळे सुमारे २० हजार अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
सुनावणी पूर्ण करून २५ डिसेंबरपर्यंत त्या मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक कार्यालयाने सर्व मतदार नोंदणी कार्यालयास दिले आहेत. त्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त मनुष्यबळ तसेच, संगणक यंत्रणा व इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नव्याने नोंद झालेल्या मतदारांची यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे.


















