- वाकडमधील घटना; या कारणासाठी उचलले टोकाचे पाउल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२१) :- डोळ्यांवर स्कार्फ बांधून एका उच्चशिक्षित तरुणीने चारमजली इमारतीच्या छतावरून उडी मारली. वाकड येथे सोमवारी (दि. २०) सकाळी सातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. नम्रता गोकुळ वसईकर (वय २४, रा. नंदनवन कॉलनी, माऊली चौक, वाकड, मूळ रा. दराणे रोहले, ता. शिंदखेडा, जि. धुळे), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नम्रताचे बीटेक (आयटी) पर्यंत शिक्षण झाले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ती घरातून बाहेर निघाली. माऊली चौकातील एका चारमजली इमारतीच्या छतावर गेली. तेथे चेहरा आणि डोळ्यांवर स्कार्फ बांधून इमारतीच्या छतावरून तिने उडली मारली. यात तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नम्रता घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सायंकाळी उशिरा ते वाकड पोलिस ठाण्यात गेले. मयत नम्रताचा फोटो पोलिसांना दाखविला. त्यानंतर नम्रताने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वसईकर कुटुंबीय मूळचे धुळे येथील आहे. नम्रताच्या भावाला नोकरी लागल्याने ते सहा महिन्यांपूर्वी वाकड येथे आले होते. नम्रताची आई गृहिणी असून वडील बूट पॉलिश करण्याचे काम करतात. नम्रताला चांगली नोकरी लागण्यासाठी ऍडव्हान्स कोर्स करायचा होता. त्याचे शुक्ल ३० हजार होते, याबाबत तिने आई वडिलांना माहिती दिली. आई- वडिलांनी नम्रताला काही दिवस थांबण्यास सांगितलं होतं. पैसे आल्यावर हा कोर्स कर असं आई वडिलांनी तिला सांगितलं होत. मात्र, पैसे जमा करून देण्याअगोदरच नम्रताने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.उच्चशिक्षित असलेल्या नम्रताने घेतलेल्या या निर्णयामुळे नातेवाईकांना धक्का बसला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.