- केंद्राकडून राज्यांना महत्वाचे निर्देश..
- नाइट कर्फ्यू, लग्नसोहळा व इतर निर्बंधांबाबत नव्याने सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२१) :- देशात ओमिक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. डेल्टा व्हेरिएंटची जागा ओमिक्रॉनने घेतल्यास दररोज १४ लाख नवे रुग्ण आढळू शकतात, अशी भीती भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केलेली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिव यांनी आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यात नाइट कर्फ्यूसह इतर निर्बंधांबाबतही नव्याने सूचना करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाकडून आधी दिलेल्या निर्देशांवर बोट ठेवत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नव्याने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यात निर्बंधांबाबतही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर आणि जिल्हा स्तरावर तत्पर राहून काम करावे. डेटा विश्लेषण, वेगवान निर्णय यासोबतच संसर्ग रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार पावले उचलली जावीत, असे निर्देश या पत्रात देण्यात आले आहेत.
मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालावे, लग्नसोहळा आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीवर मर्यादा घालाव्या, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कार्यालये, कंपन्या, उद्योग, सार्वजनिक वाहतूक सेवा येथेही उपस्थिती कमी करण्याबाबत यात सूचित करण्यात आले आहे. स्थितीनुसार हा निर्णय घेतला जावा, असे मात्र स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, देशातील १४ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. एकूण रुग्णसंख्या २२० वर पोहचली असून त्यात सर्वाधिक ६५ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर दिल्लीत ५४ तर तेलंगणमध्ये २४ रुग्ण आढळले आहेत.