- महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात होणार कर्करोगाचे निदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२२) :- कर्करोगाचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. या आजारावरील उपचार पद्धती महागडी आहे. परिणामी अनेकांना उपचार घेणे परवडत नाही. कर्करोगाच्या रुग्णांना उपचार मिळणे सुलभ व्हावे, यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिका कर्करोग रुग्णालय सुरू करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने नव्याने बांधलेल्या थेरगाव रुग्णालयात कर्करोगाचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालय सुरू करण्यासाठी अधिकची जागा लागणार आहे. त्यानुसार थेरगाव रुग्णालयाच्या बाजूची जवळपास एक एकर जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे.
कर्करोगावर उपचार करण्यासाठी रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो. ताब्यात घेण्यात आलेल्या जागेवर रेडिएशन थेरपीसाठीचे कक्ष तयार केले जाणार आहे. त्यासोबतच थेरगाव रुग्णालयातील पहिला मजला रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. शहरात सद्य:स्थितीत असलेल्या महापालिकेच्या एकाही रुग्णालयात कर्करोगावर उपचार होत नाही. शहरातील काही खासगी रुग्णालयात उपचार होतात; परंतु गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. राज्यातही खूप कमी शासकीय रुग्णालयात कर्करोगावर उपचार केले जातात.
महापालिका कर्करोगाचे रुग्णालय सुरू करण्यात येत आहेत; परंतु यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि कुशल मनुष्यबळ लागणार आहे. महापालिका रुग्णालयात सद्यःस्थितीत अतिरिक्त डॉक्टर नाहीत. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या रुग्णालयासाठी लागणारी उपकरणे, साधनेदेखील घ्यावी लागणार आहेत.
महापालिकेचे कर्करोग रुग्णालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. थेरगाव रुग्णालयात कर्करोगाचे कक्ष सुरू करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत प्राथमिक स्तरावर याबाबतचे काम सुरू आहे. शहरातील कर्करोगाच्या रुग्णांना उपचार घेणे सुलभ, यासाठी रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका…


















