- शहरातील मुख्य चौकात १५ कलाकृती साकारल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध नावीण्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत. महापालिकेने शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी विविध भागातील महत्त्वाचे १५ चौकांचे टाकाऊ वस्तूतून सुशोभीकरण करण्यात येत आहे. भंगार लोखंडी साहित्यांचा वापर करून शहर सौंदर्यात नक्कीच भर पडणार आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील चौकात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरी सौंदर्यात भर पडावी, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत विविध चौकात आकर्षक रंगरंगोटी केली. यातून एक चांगला सामाजिक संदेश देण्याचाही महापालिकेचा प्रयत्न आहे. उद्यान विभागाने भंगार साहित्यातून कुड्या व इतर साहित्य बनविले आहे. टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती बनविल्या जात आहेत.
अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य नेहरूनगरच्या गोदामात जमा केले जाते. वापरात नसलेले महापालिकेचे अनेक साहित्य पडून आहे. त्या भंगार साहित्यातून नवनिर्मितीतून कलाकृती तयार करण्याची संकल्पना आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मांडली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा साहित्यातून १५ कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. त्या शहरातील विविध १५ चौकात बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक शिल्पासाठी २ ते ३ लाखांचा खर्च झाला आहे. महापालिकेच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांची भंगार साहित्यातून आकर्षक भित्तीचित्रे निर्माण केली आहेत.
या चौकांचे होणार सुशोभीकरण…
मोरवाडी चौकात लाल घोडा, पिंपळे निलख येथे हत्ती, रावेत येथील मुकाई चौकात मावळा, पिंपळे निलख जंक्शन चौकात बिबटया, साई चौकात सुखंट, नाशिक फाटा चौकात बैल, कुदळवाडी रोटरी चौकात कार्ट टू कार, केएसबी चौकात डिजिटल बॉक्स, डांगे चौकात फ्लॉवर ऑफ पॅरडाइज, दिघी मॅगझिन चौकात पालखी यात्रा, निगडी भक्ती शक्ती समुह शिल्प चौकात मोर, दुर्गादेवी टेकडीवर खार, पिंपळे सौदागरच्या कोकणे चौकात जीवनचक्र, निसर्ग, मानवाचे नाते, गुढीपाडवा अशी शिल्पे एकूण १५ शिल्पे तयार करण्यात आली आहेत. लोकार्पण न झाल्याने ती सध्या झाकून ठेवली आहेत.