न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२२) :- मावळात गेल्या आठवडाभरापासून पावसाची संततधार चालू असल्यामुळे पर्यटकांनी गर्दी केली आहे. वाढत्या उत्साहामुळे अनुचित घटना देखील घडू लागल्या आहेत. रविवारी आणि आज सोमवारी एका बुडणाऱ्या तरुणाला वाचविण्यात यश आले तर, दुसऱ्या घटनेत एकजण बुडाला असल्याची माहिती मिळत आहे.
कुंडमाळा येथे वर्षा विहारासाठी रविवारी (दि . १०) पर्यटकांनी गर्दी केली होती. वारंवार होणारे अनुचित प्रकार टाळण्याच्या हेतूने पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांचे एक आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात होते. दरम्यान आपल्या दोन मित्रांसमवेत वर्षाविहाराला आलेला सोलापूर येथील एक तरुण फोटो काढताना तोल जाऊन नदीपात्रात पडून वाहून जाऊ लागला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या रेस्क्यू टीमने क्षणाचाही विलंब न लावता, नदीपात्रात झोकून देत बुडालेल्या व्यक्तीस बोटीद्वारे पाण्याबाहेर काढले. बुडालेल्या तरुणाच्या नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे सदर तरुण बेशुद्ध झाला होता. मात्र, संस्थेतील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या सदस्यांनी ‘सीपीआर’ देऊन तत्काळ प्राथमिक उपचार केले. सीपीआरमुळे बुडालेला तरुण शुद्धीवर आल्याने प्रयत्नांना यश आले. रोहन किसन सोनटक्के (रा. आमराई, सोलापूर) असे या वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोणवळ्यातील भुशी धरणात पर्यटक तरुण बुडल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी घडली असून लोणावळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. साहिल सरोज अस बुडालेल्या तरुणाच नाव आहे. विकेंड आणि येरव्ही लोणावळ्यात वर्षाविहारसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यांनी सुरक्षित पर्यटन करावं आणि नियमांच पालन करून वर्षाविहाराचा आनंद लुटावा अस आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी केलं आहे.
लोणावळ्यात वर्षाविरासाठी आलेल्या पर्यटक तरुण भुशी धरणात बुडाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली अस लोणावळा पोलिसांनी सांगितल आहे. साहिल हा मुंबई चा आहे. तो, इतर सहकाऱ्यांसह लोणावळ्यात आला होता. दुपारच्या सुमारास तो भुशी धरणाच्या मागील धबधब्या पर्यंत पोहचला, तिथून तो खाली पडल्याच पोलिसांनी सांगितले आहे. रविवार विकेंड ला देखील असेच काही अतिउत्साही पर्यटक पाहण्यास मिळाले. उंच डोंगरावर, धबधब्याच्या काठावर थांबून वर्षाविहाराचा आनंद घेत होते.














