न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत मोशी प्राधिकरण येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ साठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक एम.डी. वाघमारे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शहरात मोफत शिक्षणासाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय मोशी- प्राधिकरणातील ॲक्वार्ड रूग्णालयाजवळ मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात केली जाते. या वसतीगृहात १०० जणांची प्रवेश मर्यादा आहे. त्यांना प्रवेश मोफत दिले जात आहेत. वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवण, निवासाची सोय, गणवेश, शैक्षणिक साहित्य, सुसज्ज ग्रंथालय, जीम, निर्वाह भत्ता, सहल, स्टेशनरी भत्ता आदी सुविधा विनामूल्य पुरविल्या जातात. मात्र, प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतु पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरातील महाविद्यालयात अकरावी, पदविका व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेणारा असावा.
विद्यार्थ्याने अर्जासोबत मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत, शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र जोडावे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी वसतिगृहात येऊन नोंदणी करावी.’’