न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२२) :- कामाच्या ठिकाणी मयत विवाहितेची एका परप्रांतियाशी ओळख झाली. त्यातून त्यांची मैत्री होऊन ते लग्न देखील करणार होते. ती आणि तिचा परप्रांतीय मित्र राहण्यास वेगवेगळे होते मात्र, जेवण एकत्र करीत असत. बुधवारी रात्री मयत विवाहितेने जेवण तयार केले. तिने परप्रांतीय मित्राला जेवणाकरिता बोलविले. मात्र तो लवकर आला नाही. या कारणावरून तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही घटना गुरुवारी (दि. १४) सकाळी मोशी येथे घडली. सुलोचना नामदेव लेकुरवाड (वय ३०, रा. गायकवाड वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सुलोचना यांच्या पतीने दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली होती.
त्यानंतर ती लातूर येथून पिंपरी -चिंचवड शहरात आली. ती हाऊस किपिंग आणि जेवण बनविण्याचे काम करीत होती. तिला चार मुली असून त्या गावाकडे शिकण्यास आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.