- वाकडमधून सर्वाधिक मतदार स्थलांतरीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात सर्वाधिक ५१ हजार ९८९ मतदार मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत प्रभाग क्रमांक २४ मध्ये आहेत. तर, सर्वात कमी २२ हजार ४१२ मतदार थेरगाव रहाटणी रस्ता, बापूजीबुवा नगर, शिवतिर्थनगर प्रभाग क्रमांक ३४ मध्ये आहेत. महापालिकेने शुक्रवार (दि. २२) प्रसिद्ध केलेल्या १ ते ४६ प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीत एकूण १४ लाख ८८ हजार ११४ मतदार आहेत.
त्यात ८ लाख ३८४ पुरूष तर, ६ लाख ८७ हजार ६४२ महिला मतदार आहेत. तर, तृतीयपंथी ८८ मतदार आहेत. प्रारूप मतदार यादीतील १० पुरुष व ५ महिला मतदारांची नावे अंतिम यादीत वगळण्यात आले आहेत. सर्वाधिक मतदारांची संख्या किवळे, रावेत प्रभाग क्रमांक २४ (५१, ९८९), बोर्हाडेवाडी, जाधववाडी प्रभाग क्रमांक ३ (४५, ९५१), वाकड, भूमकर वस्ती प्रभाग क्रमांक ३८ (४३,७४३) आणि पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक ४० (४०,९५१) या चार प्रभागात आहे. चार सदस्य असलेल्या सांगवी प्रभाग क्रमांक ४६ या एकमेव प्रभागात मतदारांची संख्या ३८ हजार ८४१ आहे. तर, सर्वात कमी मतदारांची संख्या बापूजीबुवा नगर प्रभाग क्रमांक ३४ (२२,४१२), वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा प्रभाग क्रमांक २५ (२३,४५५), मोशी, डुडुळगाव प्रभाग क्रमांक ४ (२३,७८२), थेरगाव, पडवळनगर, बेलठिकानगर प्रभाग क्रमांक ३५ (२४,३६३) आणि ताथवडे, पुनावळे, काळाखडक प्रभाग क्रमांक ३७ (२४७५५), एचए कॉलनी, संत तुकारामनगर प्रभाग क्रमांक १७ (२५,३१०), रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर प्रभाग क्रमांक ३३ (२५,४१०), सॅण्डविक कॉलनी रामनगर प्रभाग क्रमांक ७ (२५४८२) आणि तापकीरनगर, रहाटणी, जोतीबानगर प्रभाग क्रमांक ३२ (२६,०७५) या ९ प्रभागात आहेत.
वाकड प्रभाग क्रमांक ३८ मधून सर्वाधिक ८ हजार ९५९ नावे वगळण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, वैदुवस्ती, जवळकरनगर, लक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक ४१ मधून ७ हजार ५९ नावे कमी करून इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा प्रभाग क्रमांक २५ मधून ५ हजार ९८६, मोरेवस्ती , म्हेत्रेवस्ती प्रभाग १३ मधून ५ हजार ५९९ आणि तापकीरनगर, रहाटणी प्रभाग ३२ मधून ५ हजार ४२९ नावे इतर प्रभागाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
चिंचवड प्रभाग २६ मध्ये ६,१४८ नावे वाढविली. इतर प्रभागाच्या यादीत समाविष्ट झालेली नावे काढून बिजलीनगर, दळवीनगर, इंदिरानगर, चिंचवडेनगर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ६ हजार १४८ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पिंपळे गुरव, राजीव गांधीनगर, रामनगर, काशिदनगर प्रभाग क्रमांक ४४ मध्ये ५ हजार ४१३ नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पिंपळे निलख, विशालनगर प्रभाग क्रमांक ३९ मध्ये ५ हजार ११८ नावे वाढविण्यात आले आहेत. घरकुल, नेवाळे वस्ती प्रभाग क्रमांक १२ मध्ये ४ हजार ४०३ आणि गवळीमाथा, बालाजीनगर प्रभाग क्रमांक ११ मध्ये ४ हजार २२० नावे जोडण्यात आली आहेत.














