न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनकड व विरोधी पक्षांच्या उमेदवार मागरिट अल्वा यांच्यात लढत होईल. पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्याबळाचा विचार केला, तर जगदीप धनकड यांचा विजय निश्चित असल्याचे सांगण्यात येते.
मागरिट अल्वा यांच्या उमेदवारीबद्दल विरोधी पक्षांमध्ये मतैक्य नव्हते. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मागरिट अल्वा (वय ८०) यांना उमेदवारी देताना सर्वाशी नीट चर्चा केली नव्हती, असा आक्षेप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला होता. त्यामुळे मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय तृणमूल कांग्रेसने घेतला आहे. तर टीआरएसने अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवार अल्वा या राजस्थानच्या माजी राज्यपाल तर एनडीएचे उमेदवार व भाजप नेते जगदीश धनकड़ (वय ७१) पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत. धनकड हे राजस्थानातील जाट समुदायाचे नेते आहेत.
गुप्त मतदानाद्वारे निवड उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या लोकसभा, राज्यसभा या दोन सभागृहांतील ७८८ सदस्य मतदान करतात. सर्व मतदार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य असल्याने त्या खासदारांच्या मताचे मूल्य प्रत्येकी एक इतके असून, ते मत हस्तातरणीय नसते, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. या निवडणुकीत गुप्त मतदानपद्धती अवलंबविली जाते. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत खुली मतदानपद्धती नसते. तसेच राष्ट्रपती , उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांत राजकीय पक्ष आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करू शकत नाहीत.