- शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १५ सप्टेंबर २०२२) :- वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. ‘हा प्रकल्प आधीच्या सरकारच्या डिलिंगमुळे बाहेर गेला’ , असा दावा त्यांनी केला आहे.
“हा प्रकल्प आला कधी? एखादी कंपनी स्थापन करायची असेल, तर कंपनीचा मालक वर्षभरापासून नियोजन करत असतो. तो यांना भेटला असेलच. शिंदे गट-भाजपाचं सरकार येऊन दोन महिने झाले. दोन महिन्यांपूर्वी कंपनीकडून सर्व प्रक्रिया केली असेल. पण मला मिळालेल्या माहितीनुसार टक्केवारीमुळे हा प्रकल्प इथून गेला आहे. आधीच्या राज्यकर्त्यांची डील झाली नाही. यांची डील झाली नाही, म्हणून हा प्रकल्प इथून गेला आहे. त्याचे पुरावेही मी जाहीर करणार आहे”, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
दरम्यान, आधीच्या सरकारच्या विरोधात काही पुरावे हाती लागल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला. “हा प्रकल्प जाऊच नये, या मताचे आम्हीही होतो. हा प्रकल्प दोन महिन्यांच्या कालावधीत गेलेला नाही. यांनी (आधीच्या सत्ताधाऱ्यांनी) त्यांच्या फायद्याचं गणित बघितलं. कंपनीवाला तुमच्यासाठी कंपनी टाकत नाही. तो त्याच्या फायद्यासाठी कंपनी टाकत असतो. पण प्रत्येक गोष्टीत डीलिग झाल्याचं समोर येतंय. आता ते ज्या बोंबा मारतायत, त्यावर आम्ही पुरावे समोर मांडू. आमच्या हाती काही पुरावे लागले आहेत”, असंही शिरसाट यांनी म्हटलं.
यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी येत्या ५ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात या सर्व प्रकरणावर बोलणार असल्याचं सांगितलं. “त्यांचं खोके, धोके असं सगळं सध्या चाललंय. ५ तारखेला आमच्या दसरा मेळाव्यात शिंदे त्याचं उत्तर देतील”, असा इशारा त्यांनी दिला.