न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- महापालिका प्रशासक तथा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे नव्याने वाटप करण्याचे आदेश काढले. त्यामध्ये जितेंद्र वाघ यांना वजनदार खाती देण्यात आली आहेत. तर नवनियुक्त प्रदीप जांभळे यांच्याकडे तुलनेने दुय्यम विभाग सोपविले आहेत. मात्र, उल्हास जगताप यांच्याकडील विभागाची परिस्थिती ‘ जैसे थे ‘ आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेचा ‘ ब ‘ वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली झाली. त्यांच्या जागी प्रतिनियुक्तीवरील प्रदीप जांभळे रुजू झाले आहेत. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह हे अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे वाटप कसे करतात याकडे प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले होते. त्यानुसार सोमवारी (दि. २६) शासकीय सुट्टीच्या दिवशी आयुक्तांनी कामकाजाची विभागणी करण्याचे आदेश काढले.
लेखा, अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएमचे विशेष प्रकल्प, नगररचना आणि दक्षता यंत्रणा सर्व विभागांचे कामकाज आयुक्त स्वतः पाहणार आहेत. तर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम परवानगी, पशुवैद्यकीय, बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, क्रीडा स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (प्रकल्प), वैद्यकीय मुख्य कार्यालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, आरोग्य, स्मृती आकाशचिन्ह त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
उद्यान व वृक्षसंवर्धन, अग्निशमन, शिक्षण, माध्यमिक शिक्षण (उद्यान), कायदा, कामगार कल्याण, अतिक्रमण, स्थानिक संस्था कर (एलबीटी), बीआरटीएस प्रकल्प, विद्युत, करसंकलन, पाणीपुरवठा व जल:निस्सारण, जल शुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ व मध्यवर्ती भांडार असे विभाग दिले आहेत. उल्हास जगताप यांच्याकडे सुरक्षा, नगरसचिव, समाज विकास, माहिती व जनसंपर्क, झोनिपू (स्थापत्य), आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, नागरी सुविधा केंद्र, बांधकाम नियंत्रण अशा १३ विभागांचे कामकाज जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे