न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रु.) :- पिंपरी पिंपरी-चिंचवड महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा आज शुक्रवार (दि. २२) रोजी पार पडली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवर १३ व्या क्रमांकावर स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्याचा प्रस्ताव होता.
त्याला नामदेव ढाके यांनी वायसीएमएचमधील मानधन तत्वावरील ५३ डॉक्टरांना महापालिका सेवेत कायम करण्याची आणि महापालपालिका सेवेतील प्रतिनियुक्तीवरील मुदत संपलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. पंडीत पद्माकर यांना कायम करण्याची उपसूचना दिली. त्यामुळे सभागृहातील भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले.
भाजपच्याच नगरसेविका आशा शेंडगे यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्या म्हणाल्या, डॉ. पंडीत पद्माकर यांची महापालिकेतील प्रति नियुक्तीवरील मुदत १७ फेब्रुवारीला संपली आहे. मुदत संपल्यानंतरही ते स्थायी समितीच्या सभेला कसे उपस्थित राहिले. उपसूचना मंजूर केल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल.
एकनाथ पवार यांनी मतदान घेण्याची मागणी करत भाजपचे नगरसेवक प्रस्तावाच्या बाजूने, तर ज्याला विरोधात मतदान करतील त्यांनी मतदान करावे, असे सांगितले. त्यावर आशा शेंडगे यांनी पुन्हा बोलण्याची परवानगी मागत महापौरांच्या हौदासमोर धाव घेतली. गोंधळ होण्याची शक्यता दिसताच महापौर जाधव यांनी समन्वयाची भूमिका घेत मूळ विषयच तहकूब केला.











