न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात २४ हजारांहून अधिक वाहनांच्या ब्लॅक फिल्मिंगबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
१ जानेवारी ते २७ ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा असणाऱ्या २३ हजार ९४४ वाहनांवर कारवाई करून दोन कोटी ३१ लाख १३ हजार ५०० रुपये दंड आकारला आहे. २८ ऑक्टोबर रोजी वाहतूक शाखेच्या सर्व विभागात विशेष मोहीम राबवून एकाच दिवशी ४२२ वाहनांवर कारवाई करून तीन लाख ४८ हजार ६०० रुपये दंड आकारला आहे. या मोहिमेत बावधन विभागात एकही कारवाई झाली नसून भोसरी विभागात सर्वाधिक १०० कारवाया झाल्या आहेत. वाहतूक पोलीस ऊन, वारा, पावसात वाहतुकीचे नियमन करत असतात. सातत्याने रस्त्यावर थांबून वाहनांचा धूर, धूळ यामुळे त्यांना अनेक विकार जडण्याची शक्यता असते. त्यातच नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केल्यास अनेकदा वाहतूक पोलिसांना वाहन चालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. राजकीय आणि प्रशासनातील बड्या लोकांच्या ओळखी काढून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो.
काळ्या काचा स्टेटस सिम्बॉल…
वाहनांच्या काचा काळ्या असणे हे स्टेटस सिम्बॉल ठरत आहे. मात्र वाहनांच्या काचा काळ्या करणे, त्या पारदर्शक नसणे हा अपराध आहे. यामुळे अनेकदा अपघात, गैरकृत्ये होत असल्याचे समोर येते. काळ्या काचा असणाऱ्या वाहनातून अवैध मालाची विक्री देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनांच्या काचा पारदर्शक असणे आवश्यक आहे.