न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता (फेरीवाला) आत्मनिर्भर स्वनिधी योजना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमार्फत राबविण्यात येत असून, योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे कामकाज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये व काही भाजीमंडई नजीक केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत.
या योजनेमध्ये बँकेद्वारे प्रथम कर्ज र.रू .१०,००० व प्रथम कर्जाचे परतफेड केल्यानंतर र.रू.२०,०००, तसेच द्वितीय कर्ज रक्कमेच्या परत फेडीनंतर र. रू. ५०,००० इतकी कर्जाची रक्कम देण्यात येणार आहे.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी कर्ज रकमेची विहीत मुदतीत परतफेड केल्यास कर्ज रकमेच्या व्याजावर ७ अनुदान मिळण्यास पात्र असणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाला) यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, मतदानकार्ड, लाईटबिल इत्यादी सर्व कागदपत्रांसह केंद्रावर जाऊन, योजनेचा अर्ज भरावा.
ज्या पथविक्रेता (फेरीवाला) यांचे ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, त्यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या संबंधित बँकेच्या शाखेमार्फत अर्ज मंजूरी व कर्ज वितरणाची कार्यवाही करण्यात येत असल्याने, संबंधित बँकेत उपस्थित राहून, त्याचा लाभ घ्यावा. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहरातील पथविक्रेता (फेरीवाला) यांनी प्रधानमंत्री पथविक्रेता (फेरीवाला) आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.















