- पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आरोपी काही तासांच्या आत जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- रिक्षामधुन आलेल्या तीन जणांनी हवेत फायरिंग केल्याची घटना (दि. ६) सायंकाळी पत्राशेड झोपडपट्टी, रेल्वे लाईन जवळ, लिंकरोड, चिंचवड येथे घडली होती. याबाबत गुन्हे नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना घटनास्थळी भेट देवुन आरोपींना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिला. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हयाबाबत सविस्तर माहिती घेतली. वपोनि इंगवले यांनी पथकास गुन्हयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तपासात शाहरूख शेख हा आरोपी घटनेला जबाबदार असल्याचे सिद्ध झाले.
आरोपी शाहरूख हा दापोडीत वास्तव्यास आहे. त्यामुळे पोलिसांनी तिथे तपास केला. आरोपीचा शोध घेताना पोलीस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर व सुमीत देवकर यांना माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचत आरोपी शाहरुख शाहनवाज शेख (वय २९ वर्षे, रा गुलाबनगर, दापोडी) याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शोएब अलवी, सागर मलीक उर्फ मायकल व फारूख शेख यांच्यासह गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपी मोहम्मद शोएब नौसार अलवी ( २६ वर्षे, रा. माता सटवाई मंदीर शेजारी, पवार वस्ती, दापोडी), फारूख शाहनवाज शेख (रा. गुलाबनगर, दापोडी) यांनाही पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख शेख याचा भाऊ इरफान शेख याचे गुन्हयात नाव घेतल्याचा शाहरूख यास राग होता. त्याबाबत त्याने मोहम्मद शोएब अलवी यास सांगितले होते. या कारणावरून (दि. ६) रोजी शाहरूख शेख, मोहम्मद शोएब अलवी व त्यांचा मित्र सागर मलीक उर्फ मायकल असे तिघे शोएब अलवी याच्या रिक्षामधुन पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड येथे फिर्यादीच्या घरासमोर येवुन, फिर्यादीस शाहरूख शेख याने त्याचा भाऊ इरफान शेख याचे गुन्हयात नाव का घेतले? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यावेळी मोहम्मद शोएब अलवी याने शेजारील किराणा स्टोअरमध्ये असलेल्या इसमास सीसीटिव्ही बंद कर अशी धमकी देवुन, त्यास मारहाण करून शिवीगाळ केली, गोळीबार केला. त्या दरम्यान तेथे फारूख शेख हा आला त्याने देखील फिर्यादीस शिवीगाळ करून धमकी दिली. त्यानंतर त्यांनी रिक्षामधुन लिंकरोड भाटनगर व बौध्दनगर येथे जावुन पुन्हा हवेत गोळीबार केला.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे. पद्माकर घनवट, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व अंमलदार, युनिट १ चे वपोनि काटकर व अंमलदार, युनिट २ चे वपोनि नांदुरकर व अंमलदार, युनिट ३ चे वपोनि गायकवाड व अंमलदार तसेच गुंडा विरोधी पथकातील सपोनि हरीश माने व पथकातील अंमलदार यांनी केली.