न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२२) :- रहाटणी येथील शिवार चौकातील रेनबो प्लाझा या इमारतीत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. पाच मजली या इमारती हॉटेल तसेच विविध व्यावसायिक कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये काही कर्मचारी व नागरिक अडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत.
इमारतीच्या इलेक्ट्रिक केबलसाठी असलेल्या डक्टमधून धूर निघत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता आग लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इमारतीमधील सर्व कार्यालयांमधील कर्मचारी व नागरिकांना इमारती मधून बाहेर पडण्यासाठी आवाहन करण्यात आले. आग वाढल्याने इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाला. याबाबत माहिती मिळतच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी फवारून धूर कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काच फोडून इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करीत आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत केली.
दरम्यान, शिवार चौकात मोठी गर्दी झाली होती. वाहतूक पोलीस व सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.















