न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी पगारी रजा घेऊन तब्बल एक-एक वर्ष गायब होतात. ज्या संस्थेत शिक्षण घेतात, त्या संस्था शासकीय व मान्यताप्राप्त नसतात. त्यामुळे यापुढे अशा प्रकारे शिक्षण विभागप्रमुखांकडे अर्ज करावा कीहल पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे केले आहे. परस्पर गेल्यास त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
पालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण, उच्च शिक्षण, पुढील शिक्षणासाठी अध्ययन रजा घेऊन जातात. त्या रजा काळात त्यांना पालिकेकडून संपूर्ण वेतन मिळते. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी परवानगी न घेताच परस्पर शिक्षण व प्रशिक्षणास जातात. तसेच, शासनाने विहीत केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठांखेरीज अन्य संस्थांमध्ये शिक्षण घेतले जाते. ही बाब कार्यालयीन शिस्तीस धरून नाही. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प होते. तसेच, त्या शिक्षणाचा पालिका कामकाजासाठी काहीच लाभ होत नाही.
या पुढे शिक्षण व प्रशिक्षण घेण्यासाठी विभागप्रमुखांकडे रितसर अर्ज करावा लागणार आहे. विभागप्रमुखांनी अर्जाचा विचार करून ते सामान्य प्रशासन विभागाकडे पूर्वपरवानगीसाठी पाठवावा. सामान्य प्रशासन विभागाने परवानगी दिल्यानंतरच प्रशिक्षण व शिक्षणासाठी अध्ययन रजा मंजूर केली जाणार आहे. परवानगी न घेता शिक्षणासाठी रजेवर गेल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.















