न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांतील निरुपयोगी साहित्याचा लिलाव करण्यात आला. मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या ई-लिलावामध्ये ४८ जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये १८ ठिकाणच्या भंगाराचा लिलाव करण्यात आला असून त्यामधून पालिकेला साडेपाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांतील निरुपयोगी व भंगार साहित्याचा लिलाव केला जातो. या वर्षी पर्यावरण, वायसीएम रुग्णालय, मोशी कचरा डेपो, सेक्टर २३ या ठिकाणच्या भंगाराचा लिलाव निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ई-लिलावामध्ये ४८ जणांनी सहभाग घेतला. साहित्य पाहण्यासाठी ५ दिवसांचा कालावधी दिला होता. ४८ पैकी २० जणांनी ई-लिलावामध्ये सर्व लॉटची ५ टक्के रक्कम बयाणा म्हणून भरली होती. भंगार साहित्याची बोली लावण्यात आली. त्यामध्ये सर्व १८ ठिकाणच्या भंगार साहित्याचे ५ कोटी ४६ लाख १६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. जाहीर केलेल्या किमतीपेक्षा १ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपये प्रशासनाला जास्त मिळाले आहेत.
ई-लिलाव पद्धतीने भंगार साहित्याचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये पालिकेला साडेपाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
– मनोज लोणकर, मध्यवर्ती भांडार उपायुक्त…


















