न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, शहरातील उद्यानांची नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी, महापालिकेच्या पूर्व परवानगी शिवाय शहरातील धोकादायक झालेल्या झाडांची तोडणी होणार नाही याची महापालिकेने घ्यावी, अशा सूचना जनसंवाद सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी महापालिकेला केल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब महापालिकेच्या ध्येय धोरणे, विविध निर्णयात दिसावे, शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ५७ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे ८, ११, ५, ३, ३, १, ११ आणि १० इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले. क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, रोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, सुचिता पानसरे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. रस्त्याच्या कडेला, पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, रस्त्याच्या मध्यभागी, गतिरोध आणि पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेले चेंबर व फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, उद्यानांमधील बंद पडलेली विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यात यावी. विद्युत खांबांवर, उद्यानांमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स काढण्यात यावेत, अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी, पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा, नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात, कचरा संकलित करण्यासाठी येणा-या घंटा गाड्या नियमित येतील याची दक्षता घ्यावी, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यांचे कामे तातडीने पूर्ण करावीत, रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक शौचालयांमधील बंद असलेले दिवे बदलावे, अशा तक्रारवजा सूचना आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.
















