- वेस्ट टू एनर्जीला गती, निओ मेट्रो, आंतरराष्ट्रीय शूटिंग रेंज आदी प्रकल्पांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२३-२४ चा ऑनलाइन अर्थसंकल्प (ई-बजेट) फेब्रुवारी अखेरीस सादर केले जाणार आहे. त्यात आरोग्य, शिक्षण, रस्ते, ड्रेनेज, उद्यान, कचरा व्यवस्थापन, क्रीडा या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे, असे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. प्रशासकांचा हा पहिलाच अर्थसंकल्प ठरणार आहे.
महापालिकेचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प ६ हजार ४९७ कोटींचा होता. नव्या अर्थसंकल्पाबाबत कार्यवाही नोव्हेंबर २०२२ ला सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व विभागांकडून सुधारित व नवीन अर्थसंकल्पातील खर्चाबाबत आढावा घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सूचनाही मागविण्यात आल्या. तसेच, स्मार्ट सारथीवर कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याबाबत नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. यंदाचा दुसरा ई- अर्थसंकल्प असणार आहे.
यासंदर्भात आयुक्त सिंह यांनी सांगितले की, आरोग्य व वैद्यकीय सुविधा व सेवा सुधारण्यावर अर्थसंकल्पावर भर देण्यात आला आहे. स्पेशल इम्पॅक्ट बॉण्डद्वारे निधी उभारून ओपोडी व वैद्यकीय सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येईल. जिजाऊ क्लिनिकसाठी १० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तेथे लवकरच क्लिनिक सुरु केले जाणार आहे. काही ठिकाणणी जागा ताब्यात येण्यास अडचण होत आहेत. शिक्षण क्षेत्रासाठी शिक्षणाचा जल्लोष उपक्रमाच आयोजन केले आहे. त्यातील विजेत्या शाळांना पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या जाणार आहेत.
शहराच्या उपनगरातील रावेत, किवळे, मामुर्डी आणि मोशी, चऱ्होली या भागांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार डीपी रस्ते, उड्डाण पूल व ग्रेसेपरेटर विकसित करण्यात येणार आहेत. बोपखेल पुल आणि निगडी भक्ती- शक्ती समूह शिल्प चौक ते मुकाई चौक उड्डाण पुलाचे काम केले जाणार आहे. विमानतळाकडे जाणारा ९० मीटर रस्ता नवी मुंबईच्या पाम ब्रीच रोडच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. त्रिवेणीनगर येथील जागेचा प्रश्न सुटल्याने स्पाईन रस्ता जोडला जाणार आहे. रिंग रोड व भोसरी ते चाकण निओ मेट्रो प्रकल्प शासनाच्या मान्यतेने सुरू करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्ते व स्वतंत्र जागेत पार्किंग सुरू केले जाणार आहे. पिंपळे सौदागर व रावेत येथे ती योजना सुरू केली जाणार आहे. दापोडीतील सीएमई आणि ताथवडे येथे मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) बांधून कार्यान्वित केले जाणार आहे. काही एसटीपीत सुधारणा केली जात आहे. पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत ऑटो क्लस्टर येथे उभारण्यास येणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात एचसीएमटीआर (रिंगरोड) विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील अनेक भागांत जागा आरक्षित आहे. त्या जागेत कचरा साचून अस्वच्छता निर्माण होत असल्याने तेथे उद्यान विकसित केले जात आहे. शहर सुशोभीकरणावर भर दिला जात आहे, असे आयुक्तांनी सांगितले. शहरात पालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय शूटिंग रेंज सुरू करण्यात येणार आहे. तेथे गगन नारंग अॅकॅडमीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, वाकड येथे आठ कोर्टचे बॅडमिंटन मैदान विकसित केले जात आहे. ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण पी. गोपीचंद यांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम पीपीपी तत्वावर क्रीडा संकुल उभारले जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. मोशी कचरा डेपो येथील साचलेला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग केले जात आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही सुरू केले आहे. तो कचरा येत्या २४ महिन्यांत दूर केला जाईल. कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प मार्च २०२३ ला कार्यान्वित केला जाणार आहे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.















