न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२२) :- मकरसंक्रातीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आणि इतर वीजयंत्रणेपासून सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरी व ग्रामीण भागात महावितरणच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर्स तसेच इतर वीजयंत्रणा सार्वजनिक ठिकाणी आहेत. मकरसंक्रातीनिमित्त पतंग उडविताना पतंग किंवा मांजा वीजयंत्रणेमध्ये अडकण्याची शक्यता वीज यंत्रणेमध्ये वीजप्रवाह सुरू असताना वीजतारा, रोहित्र किंवा वीजयंत्रणेत अडकलेले पतंग काढण्याच्या प्रयत्नात वीजयंत्रणेला स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होण्याची मोठी शक्यता असते.
त्यामुळे नागरिकांनी व विशेषतः लहान मुले व तरुणांनी महावितरणची विविध वीजयंत्रणा असलेल्या परिसराऐवजी सुरक्षित व मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग किंवा मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व ओला कचरा टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वीजयंत्रणेजवळ टाकलेल्या कचऱ्याने पेट घेऊन वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. परिणामी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. वीजयंत्रणेजवळ साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्याने जवळच असलेल्या विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडत आहेत. सोबतच वीजयंत्रणेला आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये किंवा जाळू नये. महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रोहित्रांना संरक्षक जाळ्या, कंपाउंड लावलेले आहे. परंतु, अनेक ठिकाणी कंपाउंडच्या आतमध्ये कचरा व शिळे खाद्यपदार्थ टाकतात. खाद्य पदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये, जाळू नये.