न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२३) :- “आध्यात्मिक विचारांशिवाय तरणोपाय नाही ” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. १६) रोजी व्यक्त केले.
बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित पाच दिवसीय स्त्रीसंत महिमा प्रवचन मालिकेतील अंतिम पुष्प गुंफताना किसनमहाराज चौधरी बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका आशा सूर्यवंशी, बबनराव चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ, कार्याध्यक्ष जयवंत भोसले, कोषाध्यक्ष मुरलीधर चोपडे, सहकोषाध्यक्ष बाबूराव पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्त्री संत महिमा या प्रवचन मालिकेंतर्गत मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांच्या चरित्राची आणि आध्यात्मिक कार्याची माहिती देताना किसन महाराज चौधरी पुढे म्हणाले की, “एकता, ममता, समता, बंधुभाव या गोष्टींची शिकवण संतांनी जनमानसात रुजवली. कोमलता, भावुकता, वात्सल्य, भक्तिभाव अशा अनेक गुणांची अनुभूती स्त्री संतांच्या चरित्रातून येते. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली बहिणाबाई ही मुलगी तुकोबांसारख्या संतांच्या सहवासात संतपदाला पोहोचली, यावरून आध्यात्मिक विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित होते ”
अनुराधा चैतन्य, सुनीता जयवंत, शालिनी थोरवे, वैशाली चिटणीस, अशोक भंगाळे, सुरेशसिंह तोमर, अनिल देशपांडे, वाल्मीक शर्मा यांनी संयोजनात सहकार्य केले.


















