न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२३) :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. शिवसेना पक्षनाव अन् चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २०) रोजी होणार आहे.
जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय समोर येईपर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये. तसंच जी कागदपत्रं शिंदे गटाने सादर केली आहेत ती बोगस आहेत, असं म्हटलं होतं. मात्र, जेष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी हे दावे खोडले आहेत. त्यामुळे लवकर निर्णय घेतला जावा असं जेठमलानी यांनी म्हटलं आहे. त्यावर अजून दोन तासांचा अवधी हवा असल्याची मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी शुक्रवारी होईल.
एकीकडे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना दुसरीकडे आज मंगळवारी निवडणूक आयोगासमोर देखील एक महत्त्वाची सुनावाणी सुरू होती. ज्याचा निकाल आज येण्याची दाट शक्यता होती. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना नेमकी कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होणार होते. परंतु ते आता शुक्रवारपर्यंत लांबणीवर पडले आहे.
शिवसेना आपलीच आहे असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी आपआपली कागदपत्रं देखील आयोगापुढे सादर केली आहेत. तसेच दोन्ही १० जानेवारीला झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आयोगाने पुढील सुनावणी १७ जानेवारीला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार आज आयोगासमोर पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर आयोग आपला निकाल जाहीर करेल, अशी अपेक्षा पुन्हा एकदा फोल ठरली असून शुक्रवारी पुन्हा निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे.