- भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा; मैदानी चाचणीला ३० जानेवारीपासून सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात जानेवारी अखेरीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. २०१९ साली जाहीर झालेल्या भरती प्रक्रियेत कॉपी प्रकरणात ५० उमेदवारांची भरती स्थगित करण्यात आली. ते ५० उमेदवार आणि १६६ नवीन अशी एकूण २१६ पदांची भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत २१६ पदांसाठी कला, विज्ञान तसेच वाणिज्य शाखेचे पदवीधारक, अभियंत्यांसह विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्रवर्गानुसार खुला ११९, इडब्ल्यूएस १४, इतर मागासवर्ग ६१, विशेष मागास ९, भटक्या जमाती (ब) ८, अनुसूचित जाती ५ असे आरक्षण आहे. त्यामध्ये दोन तृतीयपंथीयांचे देखील अर्ज आहेत. २१६ पदांमध्ये ६५ पदे महिलांसाठी राखीव आहेत.
या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा असलेली मैदानी चाचणी ३० जानेवारी पासून सुरु होणार आहे. त्याबाबत पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मागील वेळी पोलीस भरतीत थोडक्यात संधी चुकलेले उमेदवार यावेळी जोरात तयारी करीत आहेत.
पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर तृतीयपंथीयांना देखील भरतीमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे जाहीर झालेली भरती स्थगित करून पुन्हा नव्याने भरतीचे आदेश काढण्यात आले. तृतीयपंथी देखील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील भरतीसाठी दोन तृतीयपंथीयांनी देखील अर्ज केले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी आयुक्तालयांतर्गत भरारी पथके तसेच दक्षता समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून भरती प्रक्रियेवर वॉच राहणार आहे. मैदानी चाचणी तसेच लेखी परिक्षेत काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.