न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२३) :- पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकाच बाकावर बसलेले आणि भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील मैत्रिणी स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आले. शिक्षकांप्रती असलेली आदरयुक्त भीती अद्यापही चेहऱ्यावर कायम ठेवत उत्साह, आनंद आणि कौतुकाची भावना मनात ठेवत पिंपळे सौदागर येथील हॉटेल kB 9 मध्ये मैत्रिचा रौप्य महोत्सव रंगला.
पंचवीस वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या. यावेळी मीना हरिदास, संजय कुंभार, सईदा कागले नायकवडी, पार्वती मराठे, शुभांगी गमे, प्रकाश गुजराथी आदी शिक्षकांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
सन 1993-94 मधील कन्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा रविवारी 26 नोव्हेंबर रोजी नुकताच संपन्न झाला. सन 1993- 94 मधील इयत्ता दहावीच्या बॅचचे जवळपास 50 विद्यार्थांनी कार्यक्रमास हजेरी लावली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थ्यांचे स्वागत मीनाक्षी नानेकर भिलारे व सविता जाधव हिने केले. संजय कुंभार सरांनी विविध गाणी म्हणत कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मीनाक्षी नाणेकर भिलारे, गीता भालेराव, पुर्वा देसाई कामतकर, लीला कांबळे या विद्यार्थिनींनी केले.
पूर्वा देसाई कामतकर व लीला कांबळे यानी सूत्रसंचालन केले तर सुषमा शिंदे, माधुरी गुरव यांनी आलेल्या विद्यार्थिनी व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता पुर्वा कामतकर यांनी पसायदान म्हणून केली.