न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याचे पेढे वाटून स्वागत केले आहे.
त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत होते. राज्यपालांची हकालपट्टी करा अशी काँग्रेसच्या वतीने सातत्याने मागणी केली होती. त्यांनी देखील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अफजलखानी प्रवृत्तीचा राजभवनातून कडेलोट झाला. अशी टिका प्रदेश युवक सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली आहे.
जाधव म्हणाले की, ” रमेश बैस यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मनःपूर्वक स्वागत. मावळते राज्यपाल यांच्याकडून आपण पदभार स्वीकारा. पण विचार मात्र, महाराष्ट्राच्या विचाराला साजेसाच असावा ही अपेक्षा.”
















