- घरातील झाडा-झुडपांमध्ये लपून बसलेल्या बिबट्या जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२३) :- भर लोकवस्तीत बिबट्या दिसल्याने चाकण शहर परिसरात घबराट पसरली होती. जामा मस्जिद परिसरातील एका पडक्या घरात बिबट्या दबा धरून बसला असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर आता वन विभागाची रेस्क्यू टीम या बिबट्याला पकडण्यासाठी गेली. बाजार आणि बघ्यांची गर्दी यामुळे रेस्क्यू टीमला अडचणीचा सामना करावा लागला. अत्यंत शिताफीने बिबट्याला पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाला जेरबंद यश मिळाले. मांजर गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत असल्याने चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यामध्ये एक बलदंड बिबट्या घरासमोरून पळून जात असताना दिसून आला. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालय चाकण अंतर्गत बचावपथक व माणिक डोह बिबट निवारा केंद्र येथील रेस्क्यू टिम आणि चाकण पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने पडक्या घरातील झाडेझुडपांमध्ये लपून बसलेल्या बिबट्याला पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महेंद्र ढोरे आणि डॉ चंदर यांनी आपल्या जवळील बंदुकीतून बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन फायर करून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. नर बिबट्या साधारणत: एक ते दोन वर्षे वयाचा शारिरीक दृष्टया सक्षम असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले.















