न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२३) :- महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशन आयोजित शिवशंभो कार्यगौरव पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. १८) रोजी शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे संपन्न झाला.
वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जयकुमार गुंजकर आणि उद्योजक सोमनाथ खेडेकर यांना खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, योगेश बाबर, सुप्रिया चांदगुडे, कविता हिंगे, शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले; तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल वसंत ठोंबरे, वैभव ठोंबरे (क्रीडा क्षेत्र), राकेश देशमुख आणि राजेश हजारे (कामगार क्षेत्र), संतोष चंदने (शिवकालीन शस्त्रास्त्रे संकलक) त्याचप्रमाणे शिवमंदिराच्या नूतनीकरणासाठी साहाय्य करणाऱ्या श्रीकांत मोरे, अनिल सोमवंशी, रोहिदास खटाटे यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्रीरंग बारणे यांनी, “आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा वसा अन् वारसा जपण्याचे कार्य शिवशंभो फाउंडेशन एकवीस वर्षांपासून करीत आहे ” असे गौरवोद्गार काढले; तर गौतम चाबुकस्वार यांनी, “शिवशंभो फाउंडेशनने उभारलेले शिवमंदिर हे इतिहासकाळाची आठवण करून देते ” असे मत व्यक्त केले.
पुरस्कारार्थींच्या वतीने डॉ. जयकुमार गुंजकर यांनी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उद्योजक दादासाहेब फाटे यांच्या हस्ते शिवशंभो फाउंडेशनच्या सर्व पुरुष कार्यकर्त्यांचा आणि शरयू फाटे यांच्या हस्ते सर्व महिला कार्यकर्त्यांचा कृतज्ञतासन्मान करण्यात आला. केशव घोळवे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले. संजय देशमुख यांनी आभार मानले.


















