न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- मोशी गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांचा भंडारा उत्सव उत्साहात संपन्न झाला. नागेश्वर महाराज मंदिरात महाराजांचा मानाचा विडा, मानाची ओटी व मानाचे लिंबू आदी वस्तूंचा आज सोमवारी सकाळी लिलाव पार पाडला. यंदा सर्वधिक बोली लावत महाराजांच्या भंडाऱ्यात अर्पण झालेल्या वस्तू कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
मानाच्या विड्याची तब्बल ८१ लाखांची बोली मोशीतील उद्योजक अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी लावली जिंकली. या विड्यातून महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी व्यक्त केली.
तसेच, मानाची ओटी भालचंद्र बोराटे यांनी ३३ लाख ५५ हजार ५५५ रुपये तर मानाचे पहिले लिंबू (फळ) १३ लाख २५ हजार रुपयांना उद्योजक अतिश बारणे, अक्षय बारणे; दुसरे लिंबू राजू बोराटे यांनी ७ लाख ५१ हजारांना तर शेवटचे मानाचे लिंबू १७ लाख रुपयांना निरज सस्ते यांनी बोली लावून घेतले.
पिढ्यान् पिढ्या या लिलावाची बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी आणि निखिल केदारी यांनी केले. विविध वस्तूंच्या लिलावातून दिड कोटींहून अधिक रक्कम देवस्थान ट्रस्टकडे जमा होणार असून तिचा विनियोग देवस्थानच्या प्रगतीसाठी केला जाईल असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.












