- महाविकासचे नाना काटे यांचा सर्वाधिक तर भाजपच्या जगताप यांचाही अधिकचा खर्च..
- अपक्ष राहुल कलाटे यांचा चाळीस लाखांच्या आत तर, इतर दोन अपक्षांचा लाखाच खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- भारत निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार चिंचवड विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची तिसरी तपासणी आज विहित वेळेत पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
तिसऱ्या टप्प्यात भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्षण जगताप यांनी २४,२३,९१४ एवढा खर्च केला असून त्यांनी तीन टप्प्यात खर्चाची पातळी ओलांडली आहे. निवडणूक विभागाने ४० लाख रुपयांची निवडणूक खर्चाची निर्धारित रक्कम केलेली असताना त्यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनीदेखील अधिकचा खर्च केला आहे. अश्विनी जगताप यांचा एकूण निवडणूक खर्च ४४,८३,६१६ रुपये झाला आहे. तो आयोगाच्या निर्धारित रकमेपेक्षा ४,८३,६१६ रुपयांनी अधिक आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनीदेखील खर्चाची पातळी ओलांडली आहे. त्यांनी तिसऱ्या टप्प्यात २५,५९,५९६ एवढा खर्च केला असून तिन्ही टप्यात तब्बल ५१,८१,२६९ रुपयांचा खर्च करीत अश्विनी जगताप यांच्याही पुढे खर्चात आघाडी घेतली आहे. आयोगाच्या निर्धारित रकमेपेक्षा ११,८१,२६९ रुपयांचा अधिकचा खर्च त्यांनी केला आहे.
बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक खर्च २२,५७,९८७ एवढा झाला असून त्यांचा एकत्रित खर्च चाळीस लाखांच्या आत आहे. ३५,७२,२८६ एवढा खर्च त्यांनी केला आहे. त्यांच्यासह इतर दोन अपक्ष उमेदवार गोपाळ तंतरपाळे आणि सिद्धिक शेख या दोघांनी देखील एक लाखाच्या पुढे निवडणूक खर्च केला आहे. तो अनुक्रमे १,३५,९१९ आणि १,५१,३८० असा आहे. इतर पक्ष आणि अपक्षांचा खर्च लाखाच्या आत आहे.
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तिसरी तपासणी आज दि.२४ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली होती. तसे वेळापत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी, २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ, यांचे कार्यालय, “ग” क्षेत्रीय कार्यालय, ३रा मजला, थेरगाव, पुणे येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त खर्च तपासणी कक्ष, फिरते भरारी पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हिडिओ सनियंत्रण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक आदी विविध पथके कार्यरत आहेत.
भारत निवडणुक आयोग यांचे कार्यालय, निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्च विषयक तपासणी केली जात आहे. ही तपासणी तीन टप्प्यात करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीअंतर्गत उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीकरिता स्वतंत्र खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येत आहे. दरम्यान, उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली दि. १५ फेब्रुवारी रोजी तर दुसरी तपासणी दि.२० फेब्रुवारी रोजी पार पडली होती. तिसरी तपासणी आज सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून संकल्प सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लेखाधिकारी इलाही शेख आणि त्यांच्या पथकाकडून उमेदवारांच्या निवडणूक खर्च तपासणीचे काम केले जात असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक खर्च निरीक्षक म्हणून आयकर अधिकारी प्रकाश हजारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार खर्चाची मर्यादा ४० लाख रूपये इतकी आहे. मतदार संघामध्ये एकूण २८ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे आणि खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी व्हिडिओ नियंत्रण व पाहणाऱ्या पथकाकडून आलेल्या अहवालानुसार शॅडो रजिस्टर मध्ये उमेदवाराचा रोजचा प्रचारखर्च नोंदला जातो. त्याचप्रमाणे इतर पथकाकडून रोकड अथवा इतर जप्ती झाल्यास त्याचीही नोंद लेखा पथकाकडून घेतली जाते, अशी माहिती सचिन ढोले यांनी सांगितली.












