- बाराव्या फेरीअखेर विरोधकांच्या बालेकिल्ल्यातून घेतली आठ हजारांपेक्षा अधिकाची आघाडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- चिंचवडच्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला सकाळी आठपासून सुरुवात झाली. अगदी पहिल्या फेरीपासून ते बाराव्या फेरीपर्यंत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या आघाडीवर आहेत. त्यांना बाराव्या फेरीत ४२५१० एवढी मतं मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ३४३३८ एवढी मतं मिळाली आहेत. दहाव्या फेरीअखेर जगताप या काटे यांच्यापेक्षा ८१७२ एवढ्या मतांनी आघाडीवर आहेत. राहुल कलाटे यांना १३११७ मतं मिळाली आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना मानणारा तसेच, भाजपकडे झुकलेला सर्वांधिक मतदार पिंपळे गुरव, नवी सांगवी व सांगवी या भागांत आहे. सध्या मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत येथील केंद्रांवरील ईव्हीएम मशिनवरील मतांची मोजणी प्रथम केली जात आहे. शेवटच्या टप्प्यात पिंपळे गुरव, वाकड, पिंपळे निलख, नवी सांगवी व सांगवी असा उतरता क्रम आहे.
त्यामुळे विरोधकांची अधिकची ताकद असणाऱ्या रावेत किवळे परिसरातून जगताप यांनी आठ हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयाकडे जाणारा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे, असे म्हणता येईल. कारण त्यांच्या होम ग्राउंडमध्ये देखील त्याच आघाडी घेतील, अशी शक्यता आकड्यांनी दाखवून दिली आहे.
मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे.