न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- शिवजयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील मल्हारगडहून मावळमधील शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन जाणा-या शिवभक्तांच्या टेम्पोला कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर ताथवडे येथे हॉटेल साई दरबार समोर अपघात झाला. ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने ३३ शिवभक्त जखमी झाले. आज शुक्रवारी (दि. १०) पहाटे साडे चारच्या सुमारास हा अपघता झाला. ट्रकचालकाला तात्काळ अटक करावी यासाठी शिवभक्तांनी महामार्ग रोखून धरल्याने आठ वाजेपर्यंत महामार्गावर मेगा ब्लॉक झाला होता.
याबाबत टेम्पो चालक सागर भागू कोंडभर (वय. ३४, रा. शिलाटने, कार्ला, मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रकचालक नामदेव विनायक पाटोळे (वय. ३६) व क्लिनर प्रशांत विकास बनसोडे (वय. २६, दोघेही राहणार उमरगा, जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून ट्रक व क्लिनर बनसोडे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दक्ष भानुसघरे, ऋतिक कोंडभर, संस्कार कोंडभर, गणेश कोंडभर, वेदांत कोंडभर, अथर्व कोंडभर, यश कोंडभर, अभिषेक मोरे, सिध्दार्थ भानुसघरे, रोहन भानुसघरे, विरेन मोरे, सिद्धेश कोंडभर, साहिल पाटफोडे, करण कोंडभर, आदित्य सातकर, हर्ष धाम, गौरव भानुसघरे, तेजस कोंडभर, सौरभ कोंढभर यासह अन्य तेराजण जखमी झाले असून यापैकी आर्यन सोमनाथ कोंडभर व विलास पोपट कोंडभर हे अधिक जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्यावर सोमटनेतील पवना, पायोनीयर व रावेत येथील ओजस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
















